(भक्तराज गर्जे यांच्या फेसबुक वॉलवरून)
वर्तमानपत्र व्यक्तीला भूतकाळाची जाणीव आणि वर्तमानाचे अवलोकन करून भविष्याचा वेध घेण्याचा मार्ग दाखवतात. कुलाळवाडी शाळेसाठी सातत्याने अवांतर वाचनाची पुस्तके मुंबईहून पाठविणाऱ्या आदरणीय सुषमा सामंत यांची शाळेसाठी लोकसत्ता सुरू व्हावे अशी प्रचंड इच्छा. लोकसत्ता हे उत्कृष्ट दर्जाचे राष्ट्रीय वर्तमानपत्र. सद्यस्थितीत कुलाळवाडीत कुठलेच वर्तमानपत्र पोहोचत नाही, त्यात लोकसत्ता सकाळी अकरा वाजे नंतर जत मध्ये पोहोचतो. त्यामुळे काम जरा कठीणच होते.
आधी मी म्हणालो हे काही शक्य होणार नाही. परंतु मग आम्ही दोघांनीही ठरवलं की प्रयत्न तर करून पाहूया. वाचनसंस्कृती रुजविण्याचा दृढ निश्चय केल्यानंतर माझ्याशी याबाबत मार्ग काढण्यासाठी चर्चा करत असतानाच युथ फॉर जत च्या माध्यमातून देखील मावशींनी प्रयत्न सुरू केले. तरीही यातून काही मार्ग सहजी मिळत नव्हता. शेवटी मला जत हून माडग्याळ हायस्कूलला येणारे श्री. चंद्रकांत कोळी सर यांच्या माध्यमातून लोकसत्ता माडग्याळ पर्यंत पोहोचू शकेल ही जाणीव झाली. सरांना विनंती करतातच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शविला.
आता वर्तमानपत्राची वर्गणी सुषमा सामंत यांनी जमा केली आहे, ती वेळोवेळी वर्तमानपत्र विक्रेत्याला देण्याची जबाबदारी युथ फॉर जत चे श्री अमित बामणे निभावणार आहेत, कोळी सरांमार्फत लोकसत्ता आधी माडग्याळ आणि तेथून कुलाळवाडीतील विद्यार्थ्यांद्वारे कुलाळवाडी शाळेत पोहोचायला लागला.
आदरणीय सुषमा सामंत (मावशी) या कुलाळवाडीच काय परंतु जतला ही कधी आलेल्या नाहीत. कुलाळवाडी शाळेमध्ये होणाऱ्या माझी भाकरी स्पर्धेसंबंधीचा बी.बी.सी. चा व्हिडिओ बघून त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. आपल्या वाडीतील जलसंधारण, वृक्ष लागवड वगैरे कामं बघून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं भेट देण्याचे ठरवले. आणि लगेच पुस्तक पाठवायला सुरुवात केली. आपल्या मुलांनीही अत्यंत उत्साहाने पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि आता शाळेत वाचन संस्कृती चांगली रुजत आहे.
एअर इंडियात पंचवीस वर्षे सेवा केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या सुषमा मावशी अनेक भाषा जाणतात, शिकणं आणि शिकवीन ही त्यांची आवड. कुलाळवाडीतील विद्यार्थिनींशी ऑनलाइन माध्यमातून त्या नियमित संवाद साधतात.
शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा उत्साह बघून, सुषमा मावशी कुलाळवाडीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सतत कृतिशील आहेत. याचाच भाग म्हणून शाळेसोबतच कुलाळवाडीतील महिला भगिनींसाठी उपयुक्त पुस्तके त्यांनी अंगणवाडीत ही पाठविली, त्याचं व्यवस्थापन आशा सेविका सौ.महानंदा शिवाजी तांबे ताई करीत आहेत
मुलांचा शिक्षणातील आणि वाचनातील रस बघून मुंबईतील आनंद मेवा शिबिरातील पालकांच्या गटाने पुस्तकं ठेवण्यासाठी नीट सोय करता यावी म्हणून देणगीही पाठवली.
शाळेतील सहशिक्षक श्री.राख सर, केंद्रप्रमुख श्री. कबाडगे सर, मुख्याध्यापक श्री.घोदे सर यांच्या मार्गदर्शनात तसेच श्री.कोरे सर, श्री.पवार सर, श्री.मुंडे सर,श्रीमती खरात मॅडम यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करीत आहेत.
आपली मुलं चांगली शिकावीत, त्यांची प्रगती व्हावी म्हणून किती लोकं आपल्याला मदत करत आहेत....!
या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
भक्तराज गर्जे
Comments
Post a Comment