सबाल्टर्न इतिहासकार साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे
सबाल्टर्न इतिहासकार साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे इतिहासाचे चिंतक होते. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत सबाल्टर्न जाणीवा दिसून येतात. कारण साहित्य हे समाज परिवर्तनाचे फार मोठे साधन आहे. याची जाण अण्णा भाऊ साठे यांना होती. त्यामुळेच त्यांच्या साहित्यकृतीतून या सर्व गोष्टीवर प्रकाश पडतो. इतिहासकार डी.डी. कोशंबी यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ राजा, थोर पुरुष हे इतिहास घडविणारे घटक नाहीत तर खऱ्या अर्थाने उत्पादक व कामगार हे समाज घडविणारे घटक आहेत असे म्हटले आहे. त्यानुसार उपेक्षित समाजाच्या अभ्यासकांच्या मते, उपेक्षित समाजाचा इतिहास लिहिला पाहिजे. कारण यादेशातील कनिष्ठ व तुच्छ व्यक्ती शेवटी मनुष्यच आहेत. ते समाजाचे घटक आहेत. त्यांच्यातील जिवंतपणा, विचारशक्ती व प्रगतीची धडपड लक्षात घेतल्यास हा घटक डावलून जगाच्या इतिहासाला पूर्णत्व येणार नाही. कारण उपेक्षित व्यक्तींनी शोषणाविरुद्ध प्रतिकारच्या चळवळी उभ्या केल्या. त्यामुळे सर्वच पातळीवर होणाऱ्या घडामोडी उलगडून दाखविण्याची ताकद व निर्भीडपणा उपेक्षितांच्या इतिहास लेखनात आहे.
युरोपात प्रबोधनाची सुरुवात 13व्या शतकात झाली या अगोदर संपूर्ण युरोपभर धर्मगुरूचे प्राबल्य होते. धर्माशिवाय, धर्माबाहेर व धर्माविरुद्ध विचार करता येत नव्हता. धर्मगुरू म्हणतील तीच पूर्व दिशा अशा प्रकारची परिस्थिती होती. अशा अंदाधुंदीच्या, अंधकारमय काळात युरोपातील अनेक देशातील साहित्यकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रबोधनाच्या चळवळीला गती दिली. या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून माणसाला शहाणे करण्यासाठी वास्तववादी दृष्टिकोनातून साहित्य निर्मिती केली. या साहित्यिकात फ्रान्सिस्को पेट्रोक, रॉजर बेकन, डांटे, एडमंड स्पेन्सर, मिल्टन, शेक्सपियर इरस्मस, रुसो, थॉमस पेन इत्यादीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. कारण या विचारवंतांनी सर्वसामान्यांचे महत्त्व व स्थान वाढविण्यासाठी आपल्या साहित्यातून प्रयत्न केले.
उपेक्षितांच्या इतिहासाचा अभ्यास करतांना असे दिसून येते की, प्रबोधन काळातील विचारवंताप्रमाणेच अण्णा भाऊ साठे यांनी प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली. त्यांनी आपल्या लेखनातून कामगारांच्या समस्या, भांडवलदाराचे शोषण, सावकार व जमीनदाराकडून सामान्य जनतेचे होणारे शोषण, पिळवणूक व जुलुम इत्यादी विषय मांडले. त्यांचे लेखन हे वास्तववादी होते. कारण हे लेखन करीत असताना त्यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून, घटनेचा योग्य अन्वयार्थ काढून उपेक्षितांच्या इतिहासाचे लेखन केले. त्यामुळेच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याबद्दल आचार्य प्र. के. अत्रे म्हणतात, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचे साहित्य आहे. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या इतिहास लेखनातून फुले, शाहू, आंबेडकर, कार्ल मार्क्स यांनी पुढे आणलेली स्त्री त्याच प्रमाणे शुद्र व अतिशुद्राच्या मुक्तीची लढाई गतिमान करणारे नायक-नायिका यांचा इतिहास लिहून समतेची लढाई गतिमान केली. वर्ग जाणिवांनी जागृत झालेला माणूस वर्ग संघर्षाचा पाईक बनू शकतो. हे अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून जगाला दाखवून दिले जातीअंत, स्त्री-पुरुष समता या विषयाचे लेखन करीत असताना अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनात हजारो वर्षापासून या ठिकाणाहून त्या ठिकाणी भटकंती अवस्थेत जीवन जगत असलेल्या, ज्यांची इतिहासाने कधीही दखल घेतली नाही. अशा महाराष्ट्रातील उपेक्षित, भटक्या जाती-जमाती, स्त्री, दलित व आदिवासी यांच्या इतिहासाचे लेखन केले. त्याचप्रमाणे सावकार, भांडवलदार व जमीनदार या वर्गाकडून उपेक्षित समाजावर होणारे जुलूम, अत्याचार व पिळवणुक याची इतिहास लेखनात नोंद केली. त्यांनी झोपडपट्टीतील माणसाचे जीवन, स्वाभिमानी स्त्रिया, महानगराचे वास्तव, विहीर खोदून इतरांना पाणी पाजणारे, खाण खोदून रेल्वेला कोळसा पुरविणारे, डोंगर पोखरून गड-किल्ले, राजवाडे, इमारती बांधणारे, सागराच्या तळाशी हजारो फूट खोल जाऊन काम करणारे, स्वतः जगणारे व जगाला जगविणारे असे दिनदलित, वंचित, श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि कामगार इत्यादी उपेक्षितांच्या सत्य इतिहासाचे लेखन अण्णाभाऊंनी केले.
अण्णा भाऊ साठे यांनी इ.स. 1942 ते 1969 या दरम्यान जवळपास 90 ग्रंथ लिहिली आहेत. त्यांच्या ग्रंथाच्या अनेक आवृत्ती निघाल्या. या ग्रंथातून त्यांनी उपेक्षितांच्या इतिहासाबरोबरच पंधरा ऐतिहासिक पोवाडे लिहिली आहेत. त्यापैकी नानकींग नगरापुढे हा पहिला पोवाडा 1942 साली लिहिला. या पोवड्यातून रशिया व चीन संघर्षावर प्रकाश टाकला. तसेच कामगार वर्गाची होणारी फसवणूक व वर्ग संघर्ष यांचे वास्तववादी चित्र त्यांनी मांडले. 1942 मध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला. या पोवाड्यातून दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1941 मध्ये जर्मन सैन्यांनी रशियावर आक्रमण केले. या आक्रमणाचा रशियन सेना व रशियन जनता यांनी कडवा प्रतिकार करून स्टॅलिनग्राडच्या युद्धात विजय मिळवला. या युद्धाचे, रशियन जनतेच्या पराक्रमाचे वर्णन अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनात केले.
1943 44 या काळात बंगाल प्रांतात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे लाखो लोकांना भूकबळीचे शिकार व्हावे लागले. माणसाप्रमाणे जनावराचे जगणे ही अवघड झाले होते. या काळात दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी साम्यवादी विचारवंताच्या कलावंतांनी एकत्र येऊन इंडियन पीपल्स असोसिएशन (इप्ता) ही संस्था स्थापन केली. यावेळी अण्णा भाऊ साठे यांनी बंगालची हाक हा पोवाडा लिहून दुष्काळग्रस्ताच्या व्यथा, वेदना तसेच भांडवलदारांनी दुष्काळग्रस्तांचा घेतलेला गैरफायदा जनतेसमोर मांडून राष्ट्रीय एक्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते
1947 मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. आणि संपूर्ण देशभर जातीय तेढ निर्माण होऊन यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दंगलीतून माणसातल्या अमानवी वृत्तीचे भयानक दर्शन घडत गेले. त्याचे दुःख अण्णा भाऊ साठे यांना झाले. ते त्यांनी पंजाब-दिल्लीचा दंगा यातून मांडले. 1947 रोजी अमळनेरच्या शेखलाल नथु या कामगारांना गिरणी मालकाने कामावरून काढून टाकल्यावर कामगारांनी केलेल्या संपामुळे झालेल्या गोळीबारांच्या घटनेवर अण्णाभाऊंनी अमळनेरचे अमर हुतात्मे हा पोवाडा लिहिला. व कामगारांना स्फूर्ती देण्यासाठी कामगारांच्या एकजुटीचा गौरव केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचा अण्णा भाऊ साठे यांचा गाजलेला पोवाडा म्हणजे महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा होय. तसेच अग्निदिव्य ही अण्णाभाऊंची ऐतिहासिक कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तव्य तसेच प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आहे. फकीरा या ग्रंथातून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात बंड करून अन्याय व अत्याचाराचा प्रतिकार करणारे वाटेगाव जि. सांगली येथील फकीरा या क्रांतिकारकांच्या कामगिरीचे लेखन अण्णा भाऊ साठे यांनी केले आहे. या सर्व लेखनातून उपेक्षितांच्या इतिहासावर प्रकाश पडतो.
इतिहास लेखनात कथा किंवा कादंबरीला स्थान नाही कारण त्या सत्य घटनेवर आधारित नसतात परंतु अण्णा भाऊ साठे यांचे लेखन हे सत्य घटनेवर व वस्तुनिष्ठचेचा आधार असलेले आहे. त्यांचे ऐतिहासिक पोवाडे हे प्रत्यक्ष घटनेवर आधारित आहेत. त्यामुळे उपेक्षितांचा वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आधार घेतल्यास इतिहासात भर पडू शकते
लेखक: लेफ्ट. डॉ. राज ताडेराव
(इतिहास विभाग प्रमुख)
कला आणि वाणिज्य महाविद्यालय,
फोंडाघाट जि. सिंधुदूर्ग- 416 601
मो नं. 9420185772
#जत
#जनसागर
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment