इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेताय?? मग हा लेख वाचायलाच हवा! अभियांत्रिकीला प्रवेश घेताना....डॉ. शंकर दत्तात्रय नवले यांच्या लेखणीतून
इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेताय?? मग हा लेख वाचायलाच हवा
अभियांत्रिकीला प्रवेश घेताना....
डॉ. शंकर दत्तात्रय नवले यांच्या लेखणीतून
महाराष्ट्रातील एमएचटी सीइटी चा निकाल जाहीर झाला आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशेच्छूक विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे .प्रत्येक विद्यार्थी आपल्याला हवी असलेली ब्रँच व महाविद्यालय मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे या वर्षी कॉम्प्युटर सायन्स व आयटी या ब्रँच कडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा आहे. बरेचसे विद्यार्थी आपल्याला कॉम्प्युटर सायन्स व आय टी ही शाखा मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कॉम्प्युटर सायन्सच्या जागा या निश्चित आहेत परंतु कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. आपल्याला अमुक एक ब्रँच मिळावी ही इच्छा असणे काही गैर नाही परंतु त्या ब्रँच साठी उपलब्ध असलेल्या जागा व त्यासाठी असलेली प्रचंड स्पर्धा तसेच आपल्याला सीईटीमध्ये मिळालेले पर्सेंटाइल याचे गणित जुळले तरच हे शक्य आहे याचाही विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात संभ्रम आहे हा संभ्रम दूर करण्यासाठीचा हा लेखन प्रपंच.
आपण खालील प्रश्नांच्या माध्यमातून या सर्व बाबांची माहिती घेऊ.
प्रश्न- मला इंजिनीअरिंग CET मध्ये कमी पर्सेंटाईल आहेत पण मला कॉम्प्युटर सायन्स ही ब्रँच हवी आहे ती मिळेल का?
सर्वप्रथम आपण हे समजावून घ्यायला हवे की आपल्याला मिळालेले पर्सेंटाइल व कॉम्प्युटर सायन्स साठी त्या महाविद्यालयाचा कट ऑफ हे जुळले तरच आपल्याला प्रवेश मिळू शकेल याही वर्षी कॉम्प्युटर सायन्स ला प्रचंड मागणी असल्यामुळे सहाजिकच सर्वच महाविद्यालयात या ब्रँच साठी तगडी स्पर्धा असल्यामुळे मेरीट हाय जाण्याची शक्यता आहे.
प्रश्न- मला कॉम्प्युटर सायन्स ब्रँच हवे आहे परंतु न मिळाल्यास मी कोणती ब्रँच निवडू?
उत्तर- आपण कोणती ब्रँच निवडावी यासाठी आपली आवड काय आहे आपला नैसर्गिक कल कशाकडे आहे हे विद्यार्थ्यांनी व पालकांनी पडताळून पाहिले पाहिजे. सर्वजण कॉम्प्युटर सायन्सला इच्छुक आहेत मग मी पण तीच ब्रँच निवडणार हा अव्यावहारिक विचार करून चालणार नाही मागच्या काही वर्षात आयटी क्षेत्रात निर्माण झालेल्या प्रचंड संधी वाढल्यामुळे कॉम्प्युटर सायन्स कडे ओढा वाढणे हे साहजिक आहे परंतु सदासर्वकाळ हीच परिस्थिती राहील अशी शक्यता नाही. कदाचित चार वर्षात मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर अभियंते निर्माण झाल्यामुळे नोकऱ्यांचा तुटवडा जाणवू शकेल कारण शेवटी मागणी व पुरवठा हे तत्व मार्केटला कंट्रोल करत असते. आता सध्या आयटी क्षेत्राला मागणी आहे व पुरवठा ही बऱ्यापैकी आहे, पाच वर्षानंतर कदाचित मागणी तेवढीच असू शकेल परंतु पुरवठा कितीतरी प्रमाणात मोठा असू शकतो म्हणजेच आज अभियांत्रिकी प्रथम वर्षातला विद्यार्थी पास होईपर्यंत चार वर्षात कॉम्प्युटर अभियंत्यांचा पुरवठा खूप वाढलेला असेल याचा परिणाम कमी नोकऱ्या किंवा कमी पगाराच्या नोकऱ्या किंवा बेकारी असेही चित्र दिसू शकेल त्या उलट ज्या ब्रँचेस ला कमी स्पर्धा आहे परंतु चांगल्या महाविद्यालयात वेगळ्या ब्रँच ला प्रवेश घेतल्यास उत्तम करिअर करता येऊ शकते, जिथे गर्दी आहे तेथे जाऊन स्पर्धा करण्यापेक्षा जिथे कमी स्पर्धा आहे तेथे जाऊन आपले कर्तुत्व सिद्ध करणे जास्त श्रेयस्कर आहे.
आपल्या सर्वांना माहीत आहे की चालू दशक हे इलेक्ट्रिक वाहनांचे असणार आहे इलेक्ट्रिक स्कूटर, बसेस,ट्रक या मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणार आहेत मग त्यासाठी नैसर्गिकपणे इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअर्स ची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे याचा विचार विद्यार्थी व पालकांनी निश्चित केला पाहिजे.औद्योगिक भरभराट होत असताना साहजिकच बांधकाम क्षेत्रात मोठी तेजी अपेक्षित आहे त्यामुळे स्थापत्य अभियंत्यांची गरज देखील वाढणार आहे.
प्रश्न- एखाद्या साधारण महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली तर घेऊ का?
उत्तर- हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे काही विद्यार्थी असा विचार करतात की साधारण कॉलेज कॉलेज का असेना पण कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळवायची, आता प्रश्न उरतो महाविद्यालयाचा दर्जा कसा ठरवायचा तर त्या कॉलेजचे ऍकॅडमिक रेकॉर्ड, नॅक कमिटी चे मानांकन, टीचिंग लर्निंग ची प्रक्रिया, महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या प्लेसमेंट च्या संधी, सध्या शिकत असलेल्या तेथील विद्यार्थ्यांचे अभिप्राय या बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांनी दर्जा ठरवावा. कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळते म्हणून दर्जाहीन महाविद्यालयात डिग्री घेऊन सुद्धा हाती काहीच पडले नाही तर मग काय उपयोग त्या पेक्षा दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयातून इतर ब्रँच ला प्रवेश घेऊन करिअर घडवणे अधिक योग्य राहील मात्र त्यासाठी प्लेसमेंट रेकॉर्ड,नॅक चे मानांकन व वर नमूद केलेल्या बाबींची शहानिशा विद्यार्थी व पालकांनी स्वतः त्या महाविद्यालयात जाऊन करणे अत्यंत जरुरीचे आहे.
प्रश्न- मला आय टी क्षेत्रातच करियर करायचे स्वप्न आहे पण कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश न मिळता इतर ब्रँच मधून हे करिअर करणे शक्य आहे का?
उत्तर- आयटी क्षेत्रात काम करण्याची इच्छा अनेक जणांची असते आणि ती असायला हरकत नाही, पण म्हणून त्याला कॉम्प्युटर सायन्सचीच डिग्री लागते हा निव्वळ भ्रम आहे. आमच्या महाविद्यालयातील कित्येक विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये पदवी मिळवून नामवंत आयटी कंपन्यात नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, एकदा का तुम्ही अभियांत्रिकीचे डिग्री मिळवली व आवश्यक ते सर्टिफिकेट कोर्सेस केले की आयटीच्या कंपन्यांचे दरवाजे खुले होतात त्यामुळे हा गैरसमज दूर होणे फार आवश्यक आहे
प्रश्न- ऑनर्स डिग्री म्हणजे काय?
उत्तर-बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनर्स डिग्री म्हणजे काय माहित नाही त्यामुळे याची माहिती सर्व पालकांना असायला हवी नव्या शैक्षणिक धोरणानुसार व AICTE च्या मार्गदर्शक तत्वानुसार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ऑनर्स डिग्री ही मिळण्याची संधी मिळणार आहे पूर्वी फक्त बी. ई. किंवा बी.टेक. डिग्री मिळायची परंतु आता ऑनर्स डिग्री म्हणजेच रेग्युलर बी.टेक. डिग्री सोबत काही पूरक व पुढील प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता ओळखून काही विशिष्ट अभ्यासक्रम या ऑनर्स डिग्री मध्ये अभ्यासले जाणार आहेत.
उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या रेगुलर डिग्री सोबत रोबोटिक्स, 3 D प्रिंटिंग, एनर्जी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल वेहिकल्स, सस्टेनेबल इंजिनिअरिंग, डिजास्टर मॅनेजमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयांची निवड ऑनर्स डिग्रीसाठी करण्याची मुभा त्या विद्यार्थ्याला असणार आहे. अर्थात ही विद्यार्थ्यांची पसंती असेल. रेग्युलर अभ्यासक्रमासोबत उदयन्मुख तंत्रज्ञानाचा अभ्यास व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही ब्रँच निवडली आणि ऑनर्स डिग्री मिळवली तरी त्याला प्रचंड मोठ्या संधीचे दार खुले असणार आहे.
(लेखक हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता व सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)
Comments
Post a Comment