मृदा व खडक संग्रहालय हा एक स्तुत्य उपक्रम: प्राचार्य अभयकुमार साळुंखे, राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभागाचा पुढाकार
मृदा व खडक संग्रहालय हा एक स्तुत्य उपक्रम: प्राचार्य अभयकुमार साळुंखे
राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभागाचा पुढाकार
जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. जगभरातील विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे मृदा व खडकाचे नुकसान होत असताना त्याचे संवर्धन व माहिती संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राजे रामराव महाविद्यालयातील भूगोल विभाग करत आहे, अशा शब्दात श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कौतुक केले. ते राजे रामराव महाविद्यालयाला दि.१५ जुन २०२३ रोजी दिलेल्या भेटीमध्ये महाविद्यालयातील विविध विकास कामांचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे भाषा प्रयोगशाळा व इतिहास विभागातील ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पृथ्वीतलावर अनेक प्रकारचे खडक व मृदेचे प्रकार पाहायला मिळतात. खडकाचे अग्निज, स्तरित व रूपांतरित हे मुख्य प्रकार तसेच अनेक उपप्रकार ही आहेत. तसेच मृदेचे ही काळी मृदा, लाल मृदा, चुनखडी इत्यादी प्रकार पडतात. या खडकात व मृदेत अनेक खनिजे असतात. या सर्वांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा, यासाठी राजे रामराव महाविद्यालयाच्या भूगोल वतीने मृदा व खडक संग्रहालया साठी पुढाकार घेतला होता. त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी अर्थ सहसचिव प्राचार्य पुंडलिक चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, उपप्राचार्य प्रा.महादेव करेन्नवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, भूगोल विभागातील डॉ. प्रफुल्ल गायकवाड, प्रा. लक्ष्मण मासाळ प्रा. विद्या कांबळे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment