लोकशाही में सबकुछ चलता है!: प्रा. निरंजन फरांदे

दैनिक सकाळ वृत्तपत्रातील 'सह्याद्रीची शब्दफुले' सदरातील आमचे सन्मित्र प्रा. निरंजन फरांदे यांचा 
आजचा लेख...लेख क्र. २१

लोकशाही में सबकुछ चलता है!
                   
        
         राजकीय गप्पांनी नेहमी गजबजलेली चहा टपरी आज शांत शांत होती. गॅस सिलेंडरचे भाव परवडेनासे झाल्यामुळे चहावाला अगदी काटकसरीनं शेगडी कमी-जास्त करत होता. चहाला चांगली उकळी आली होती. पातेल्यातून निघणाऱ्या वाफा हवेत मिसळून हवा प्रफुल्लित होत होती. दोन-तीन वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचा गोल पुडका नुकताच येऊन पडला होता. त्याला कोणी हातही लावला नव्हता. त्यामुळे त्याचे कोरेपण टिकून होते.
          रोज सकाळी याच टपरीवर चहाचे घुटके घेत एकमेकांच्या अंगावर जाणारे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक आज स्मशानात आल्याप्रमाणे शांत होते. एरवी आपापल्या पक्षांच्या भूमिकांवर (महा)चर्चा करणारे, नेत्यांची बाजू घेऊन एकमेकांना भिडणारे कार्यकर्ते अगदी मुंगीच्या पावलानं टपरीवर येऊन मान खाली घालून चडीचूप बसले होते. त्यातल्या तिघाचौघांवर तर पक्षाच्या आंदोलनावेळी पोलिसांनी केसेस घातल्या होत्या. त्यांच्या जोडीला पक्षांच्या वैचारिक भूमिका मांडणारे अभ्यासू वगैरे एक-दोन जण तर अगदीच अंग चोरून बसले होते.
      काल-परवापर्यंत जो आपला विरोधी पक्ष होता , तोच आज जिवलग मित्रपक्ष झाला होता. म्हणजे ज्यांच्या विरोधात आंदोलने केली, घोषणा दिल्या त्यांना अचानक ताटात जेवायला घेणे, हा काय प्रकार , हे कार्यकर्त्यांना कळत नव्हते. ही घोर फसवणूक आहे अशी सर्वांचीच भावना होती.  पण 'कोडगेपणा' हा अलीकडच्या राजकारणाचा स्थायीभाव असल्यामुळे तसे वागावेच लागणार होते. फक्त अडचण होती ती विरोधकांच्या हातात हात घालून लोकांच्या समोर जाण्यात. ते अवघडलेपण कार्यकर्त्यांना असह्य झाले होते. 
         जनतेत फिरताना "तुमचे वाली आम्हीच ! "असा अविर्भाव असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आता वाली उरला नव्हता.
      पक्षापेक्षा नेते मोठे,  विचारधारेपेक्षा सत्ता महत्वाची, सत्तेमध्ये स्वार्थ अतिमहत्त्वाचा अशी सगळी परिस्थिती होती. सत्तेच्या सारिपाटावरील आपण फक्त प्यादी ! आपली किंमत,आपल्या कामाची किंमत, आपल्या म्हणण्याची किंमत किती ?
        विचारांच्या तंद्रीत चहाचा एक कप संपून दुसरा सुरू झाला. शेवटी काल ज्यांच्याशी भांडलो त्यांच्याकडेच प्रेम आणि स्नेहभावाने बघत कार्यकर्त्यांनी चहाचा दुसरा कप एकमेकांना धडकावत एका नव्या अध्यायासाठी चिअर्स केला.
        शेवटी देशात लोकशाही आहे. लोकांनी लोकांच्यासाठी राज्य करायचं असतं. तसंही लोक तरी कुठं फुकट मतं देतात ? मटन-दारूचा , साड्या-सहलींचा नैवेद्य त्यांनाही लागतोच की ! मग काय फरक पडतो विरोधी पक्षाने सत्तेत घुसलं म्हणून ? शेवटी जशी प्रजा तसा राजा.. हो लोकशाहीत राजेशाही कुठून आली ? हवं तर घराणेशाही म्हणा ! जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाने लोकशाही शासन व्यवस्थेतील सर्व शक्यतांचा परिचय जगाला करून देणे , हे कर्तव्यच आहे.
     चिअर्स....चिअर्स.... मारा फुरके... विकासासाठी सर्व काही माफ आहे. 
         चहावाल्याने ही कार्यकर्त्यांची युती-आघाडी बघून कपाळावर हात मारला. त्याच्यासमोर प्रश्न होता, कालच्या भांडणात दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांकडून फुटलेल्या तीन कप आणि दोन बशांचे पैसे नेमके कुणाकडून घ्यायचे???

#जत
# प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील