'शिक्षण', प्रश्न सोडवणारं हवं! : प्रा. निरंजन फरांदे



'शिक्षण', प्रश्न सोडवणारं हवं! : प्रा. निरंजन फरांदे 

          उन्हाळ्याचे दिवस. त्यात भर दुपारची वेळ. वेगात धावत असलेली बस अचानक कुठल्यातरी उड्डाणपूला खालून मोठे वळण घेते. ब्रेकचा कर्कश्श आवाज अर्धवट झोपेतल्या प्रवाशांना खडबडून जागं करतो. मुख्य महामार्ग सोडून आडबाजूच्या कुठल्यातरी बसस्थानकावर नियम आणि सक्ती म्हणून बस काही मिनिटे थांबणार असे वाटत असतानाच बसचा चालक वाहकाला जोरात आवाज देतो. "ए उतर जरा खाली, चूळ भरू, कटिंग मारू आणि मग निघू पुढं!" चालकाच्या हाकेला प्रतिसाद म्हणून दार उघडले जाते. प्रवाशांना काही सूचना देण्याची आवश्यकता न भासल्याने बसचे दार तसेच उघडे ठेवले जाते.
      शेजारी बसलेल्या प्रवाशाला पुरेसं सावध करून एकेक जण लघुशंकेच्या निमित्तानं पाय मोकळे करायला खाली उतरू लागतो. 
         इतक्यात अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारात आकाशवाणीची जाहिरात लागावी अशा आवाजात एक विक्रेता बसमध्ये चढतो. पायात 'बूट', पण तोही वर्षानुवर्षे वापरून पुरता झिजलेला. अंगावर एक साधाच शर्ट, पॅन्टमध्ये खोचून नीटनेटके  दिसण्याचा केबिलवाना प्रयत्न. पण त्या प्रयत्नाला कमरेला पट्टा नसल्यामुळे बाधा आलेली. विस्कटलेले केस, दुपारच्या उन्हात बसस्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या पाठीमागे पुढे धावून चेहरा काळवंडलेला. दाढीचे खुंट वाढलेले.
         त्यानं गळ्यात असंख्य हेडफोन टाकले होते. कितीतरी चार्जर त्याच्या हातावर लोंबत होते. छोट्याशा तारेच्या हातात बसेल एवढ्या चौकोनात त्याने मोबाईलशी संबंधित नानाविध चीजवस्तू अडकवल्या होत्या. एका विशिष्ट सुरात त्याची जाहिरात चाललेली. आपल्याकडे सौजन्य नावाचा प्रकार अभावानेच असतो आणि आढळतो. अर्थात अत्यंत तुच्छतेने किंवा आम्हाला याची गरज नाही, अशा दृष्टीने लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून खिडकीतून बाहेर बघत होते. काही म्हातारे कान देऊन ऐकत होते. एक-दोन जण त्याला धक्का मारून खाली उतरले, एक-दोघे आतही आले. अशा सगळ्या प्रतिकूलतेत बस केव्हाही निघेल, अशी स्थिती असताना तो मात्र एखादी तरी वस्तू विकली जाईल या आशेने प्रयत्नांची पराकाष्टा करत होता. 
         काहींनी वस्तू घ्यायची नसतानाही केवळ निरीक्षणासाठी हातात घेऊन उलटी पालटी केली. त्याला माघारी दिली.
     किती स्वच्छ उच्चार, स्पष्ट आवाज. शाळा-कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकासात 'सभाधीटपणा' नावाचा प्रकार शिकवतात. याच्याकडे तो तर अफाट होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या नानाविध नजरा सहन करण्याची सहनशीलता! कदाचित पोटाचा प्रश्न माणसाला सहनशील बनवत असेल. 
      आशाळभूत चेहऱ्याने त्याने सबंध बसमध्ये दोन फेऱ्या मारल्या. प्रत्येक बाकावर चौकशी केली. अखेर शेजारील एका सीटवर तो काही क्षण विसावला. 
      न राहून मी त्याला विचारलं "किती शिक्षण झालंय?" तो थोडा संकोचला. पुन्हा बोलला, दोन विषयात डबल ग्रॅज्युएट झालोय! 
मी पुढचा प्रश्न विचारणार इतक्यात तोच पटकन बोलला "ग्रॅज्युएशन नंतर नोकरीसाठी भरपूर प्रयत्न केले. मिळाल्याही पण घर चालू शकेल एवढे पैसे ग्रॅज्युएशनवर कोण देणार? काही दिवस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. पण वय वाढतंय, जबाबदाऱ्या आहेत. शेवटी हा मार्ग पत्करला. तुम्ही पुढचे प्रश्न विचारायच्या आधीच सगळं सांगून टाकलं! कारण अनेक जण हेच प्रश्न विचारतात. कधी कधी स्वतःचा, घेतलेल्या शिक्षणाचा आणि या व्यवस्थेचा भयान राग येतो. सगळं फसवं वाटतं! 
मी स्तब्ध. काय बोलणार ?
      पुढच्या बाकावरील म्हातारा बराच वेळ हेडफोन कानात घालून बघत होता. शेवटी हा झटकन उठला, "बाबा घेणारे का नाही ?  नाहीतर द्या माघारी , दुसरी एसटी आली." त्यानं लगबगीनं म्हाताऱ्याच्या हातातला हेडफोन घेऊन बस सोडली. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. घामाने मळलेली त्याच्या शर्टची कॉलर भयंकर अस्वस्थ करत होती. 
         चालक वाहकाने गाडी हलवली. बसचा काळा धूर हवेत मिसळला. धुळीचा एक लोट उठला. बसच्या खिडकीतून माझी नजर त्याला शोधत होती. मुख्य रस्त्याला बस लागताना खरंच आमची नजरा नजर झाली. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षाने व्यवस्थेला विचारलेले हजारो प्रश्न अंगावर आदळले. गाडीने वेग घेतला...
बघूयात नव शैक्षणिक धोरण किती प्रश्न सोडवतंय ते!

# प्रा. निरंजन फरांदे 
# जनसागर, जत 
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी