गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) : दि. ५. गुरु म्हणजे ज्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. प्राचीन काळी गुरुकुलात गुरू केवळ शिक्षणच देत नसत तर शिष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असत. त्या काळी गुरूला खूप महत्त्व होते. आजही तेच आहे, परंतु परिस्थितीनुसार गुरु शिष्य परंपरेची व्याख्या करताना काही बदल झाले आहेत. अलीकडच्या काळात शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्ग चालवणारे, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान याचे शिक्षण देणारे, नृत्य, वाद्य, संगीत व शारीरिक शिक्षण या कला शिकवणारे सुद्धा शिक्षकच आहेत. त्यामुळे गुरु-शिष्य ही प्राचीन भारतीय परंपरा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अशोक बोगुलवार उपस्थित होते.
अधिक बोलताना प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, मुलांची पहिली शिक्षिका ही आई असते. ती मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी व आचरण अशा गोष्टींकडे लक्ष देत असते. लहान वयातच मुलाला कुटुंबात व समाजात काय चालले आहे, हे आईच्या माध्यमातूनच कळते.
आपले आई -वडील हेच जीवनातील पहिले गुरू होत. आपल्या अडचणीच्या वेळी मदत करणारा प्रत्येक माणूस हा आपला गुरुच असतो. मग तो वयाने मोठा किंवा लहान असो, असेही यावेळी ते म्हणाले. तत्पूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक व महाविद्यालयाप्रती भावना व्यक्त केल्या. यामध्ये विवेक माळी, अमृता आलूर, सुवर्णा सावंत, नीता लोखंडे व ऐश्वर्या जीवान्नवर हिचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुजाता सावंत यांनी केले. सूत्रसंचालन सानिका लवटे तर आभार अक्षता व्हणखंडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment