'सहकार' करी उद्धार, पण कुणाचा?


'सहकार' करी उद्धार, पण कुणाचा? 

          किमान पाऊण कोटींची भली मोठ्ठी लठ्ठ गाडी खड्ड्यांमधून डौलत-डुलत तोल सांभाळत समोरून निघून गेली. ती पाठमोरी झाली तशी धुळीचा एक लोट उठला. रस्त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या माणसांनी क्षणभर डोळे चोळले. काहींनी शिव्या हासडल्या. ज्या कमानीतून गाडी बाहेर आली त्या कमानीवर आता गंज चढला होता. तांबरलेल्या खांबांवर वेलींनी चढाई केली होती. 
        कमानीवरील अक्षरांचे रंग केव्हाच उडून गेले होते. तरीही 'विना सहकार नाही उद्धार' हे वाक्य ओळखू येईल इतके स्पष्ट दिसतच होते. 
       एकेकाळी संपूर्ण राज्यात श्रीमंत समजल्या गेलेल्या साखर उद्योगातील एका सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरचे हे दृश्य. आता ही संस्था ठार आजारी पडली होती. चालवणारे ठणठणीत होते. पण कारखाना मृत्यूशय्येवर होता. खरे तर हे दृश्य आता सर्वत्र पहावयास मिळते. अगदी प्रत्येक जिल्ह्यात ही स्थिती समाजमान्य झाली आहे.
         सहकार! लोकसहभागातून लोकविकास. ऐकायला, म्हणायला आणि बोलायला अगदी सुरेख वाटणारे गुळगुळीत शब्द. एकेकाळी या शब्दांना अर्थही होता म्हणे! पण आज मुद्दा हा आहे महाराष्ट्रातील सहकाराचं काय झालं ? त्यातला पुढचा प्रश्न , सहकारात काम करणाऱ्या नेत्यांचं काय झालं? त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांचं काय झालं? रक्ताचं पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय झालं? 
     सहकार हा सहकार राहिला की नव्या सरंजामशाहीचा उद्गाता ठरला? हजारो शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचा पैसा पणाला लावून या अवाढव्य संस्था उभ्या केल्या. लोकशाहीत मतदार 'राजा' असतो. (औटघटकेचा का असेना पण असतो!) तसं सहकारात शेतकरी-सभासद संस्थेचा मालक असतो असं म्हणतात. पण खरंच असतो? 
           असतो तर मग स्वतःच्याच घामाचा दाम त्याला का मिळत नाही? मिळण्याची शाश्वती तरी असते का? बंद पडलेल्या कारखान्यांमधले कामगार कसे जगत असतात? चार-चार वर्ष विनापगार खितपत पडलेल्यांचे संसार असे चालतात? घरदार-गाव सोडून पोटासाठी परमुलखात आलेल्या लोकांचे परतीचे दोर कापलेले असताना जगण्याच्या भीषण लढाईत ते तग तरी कसा धरतात? 
           मध्यंतरी अनेक कारखान्यांच्या आजूबाजूला असलेल्या शेतांमध्ये रोजंदारीवर कामाला येणाऱ्या अनोळखी बायकांची संख्या वाढली होती. नंतर लक्षात आलं, कारखाना दिवाळखोरीत निघाल्यावर पोटासाठी मिळेल तो उद्योग करण्याची पाळी या कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबावर आली आहे. त्यामुळे घराचा उंबराही कधी न ओलांडलेल्या स्त्रीयांना देखील डोक्यावरचा पदर कमरेला खोचून  बाहेर पडावे लागले आहे. कित्येक जण हक्काचा थकलेला पगार सोडून परागंदा झाले आहेत. कोणी फिरता धंदा सुरू केलाय, कुणी भाजी विकतोय, कुणी भजी विकतोय. 
         कोणी बंड करून पुढे आला की त्याला थंड करण्याचीही व्यवस्था सरंजामशाहीने करून ठेवलेलीच आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या बळीराजाचं आणि त्याच्या लेकरांच हे दडपलेलं आक्रंदन कोणी ऐकेलं काय ? 
उद्योग खाजगी असला की भरभराट होते. पण लोकांचा असला की मोडीत निघतो. हा काय प्रकार? 
       की बळीला पाताळी गाडण्याची परंपरा अशीच चालू रहाणार आहे? लोकशाहीत लोकांचा मृत्यू अटळ असतो , अशी तर लोकशाहीची व्याख्या नव्हे ना?

#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी