महिला सबलीकरण, काळाची गरज: पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड
महिला सबलीकरण, काळाची गरज: पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड
खलाटीत विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये व्याख्यान
जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.३. समाजपरत्वे, देशपरत्वे स्त्रियांचे स्थान आणि भूमिका तेथील समाज व देशांच्या रूढी, परंपरा, मूल्ये, मानदंड यामुळे संपूर्ण जगाचा विचार करता स्त्री-पुरुषांच्या स्थान व दर्जामध्ये विविधता आढळून येते. सतत महिला सबलीकरण या संदर्भात अनेक व्यासपीठांवर चर्चा होताना दिसते. “महिला सबलीकरण, म्हणजे मानवी व्यवहारांच्या सर्वच पातळींवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.” महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरातून समान संधी, स्थान व अधिकार देऊन महिला सबलीकरण करणे शक्य आहे. ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जत पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक व निर्भया पथकाच्या प्रमुख राजश्री गायकवाड यांनी व्यक्त केले. त्या राजे रामराव महाविद्यालयाच्या मौजे खलाटी ता. जत येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. यावेळी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, खलाटीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. लता देवकते व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अनिता जगताप उपस्थित होत्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. अनिता जगताप म्हणाल्या, अलीकडे पुरुषांच्या बरोबरीने महिलाही प्रत्येक क्षेत्रात काम करत असून अनेक क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. बरीच वर्ष कष्ट व काम केल्यामुळेच एक यशस्वी उद्योजक बनून जिव्हाळा उद्योग समूहासारखा मोठा उद्योग उभा राहू शकला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके, सूत्रसंचालन प्रा.अतुल टीके यांनी केले तर आभार प्रा. पुंडलिक चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी कॉन्स्टेबल विजया कुंभार, कॉन्स्टेबल केरबा चव्हाण, सौ.दिपाली देवकते, राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्राध्यापक, मेजर गणेश शेजुळ, ज्ञानेश्वर देवकते, सखाराम कोळी, बाळासो पुजारी, लक्ष्मी माध्यमिक विद्यालय खलाटी येथील विद्यार्थी व शिक्षक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment