जवान देशाचा आधारस्तंभ असतो: अंकुश शेजाळ

जवान देशाचा आधारस्तंभ असतो: अंकुश शेजाळ
खलाटीत सन्मान राष्ट्रीय योद्धांचा कार्यक्रम संपन्न

जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): ऊन, वारा, पाऊस, वादळ, उष्णता व अतिकडाक्याची थंडी अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाऊन देशाची व राष्ट्राची कर्तव्यदक्ष सेवा करणारा जवान हा देशाचा आधारस्तंभ असतो, असे प्रतिपादन माजी सैनिक अंकुश शेजाळ यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे खलाटी, ता. जत येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवशी 'सन्मान राष्ट्रीय योद्धांचा' या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून खलाटी गावचे माजी सैनिक बाळासाहेब भिरडकर उपस्थित होते.
       पुढे बोलताना शेजाळ म्हणाले, सैनिक अनेक गोष्टींचा त्याग करतो. आपले कुटुंब समाज व गाव सोडून देशाच्या सीमेच्या संरक्षणासाठी तो डोळ्यात तेल घालून उभा राहतो. त्यावेळी सर्व नागरिक शांततेने झोप घेतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष भिरडकर म्हणाले, दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील अनेक तरुण देशसेवेचा ध्यास घेऊन सैन्यात, पोलीस व इतर संरक्षण क्षेत्रामध्ये भरती होतात. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा हातभार असतो. त्यामुळे सैनिक खरा देशाचा आधारस्तंभ आहे. यावेळी खलाटी गावचे ॲड. संदीप कोळी यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
        नुकत्याच भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून भरती झालेल्या खलाटी व पंचक्रोशीतील सैनिकांचा राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये नितीन गडदे, नागाप्पा खांडेकर, सुरज कडीमणी, अजय ऐवळे, आशिष लोंढे व प्रवीण चौगुले समावेश होता. गावातील आजी- माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात आला. प्रत्यक्ष सीमेरेषेवरती देशाचे संरक्षण करणारे गणेश शेजाळ, अजिंक्य कोळेकर सुधाकर शेजुळ तर बंडू शेजुळ, दादासो शेजुळ, दऱ्याप्पा शेजुळ या माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात आला.
     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अतुल टिके, सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके तर आभार कु. शुभांगी माने हिने व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी, डॉ. राजेंद्र लवटे, दगडू पाटील, दऱ्याप्पा शेजुळ, विकास चौगुले, आशिष पडोळे, वैभव इरकर, बाजीराव शेजुळ, शशिकांत कोळी, राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्राध्यापक, बाळासो पुजारी, व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील