राजे रामराव महाविद्यालयाचा पारंपारिक दिन उत्साहात
राजे रामराव महाविद्यालयाचा पारंपारिक दिन उत्साहात
नृत्यांवर थिरकली तरुणाई!
जत(प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): राजे रामराव महाविद्यालय,जत सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. आपल्या उद्घाटनपरक भाषणात बोलताना ते म्हणाले, 'आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे, पंथाचे, भाषेचे लोक राहतात. या सर्व लोकांना एकत्रित जोडण्याचे काम हे भारतीय संविधनाबरोबरच भारतीय संस्कृतीने केलेले आहे. भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन व समृद्ध आहे आणि या प्राचीनतम संस्कृतीचे जतन अशा पारंपारिक दिनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातूनच होत असते.'
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोगुलवार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व म्हणाले, 'शैक्षणिक कामकाजा बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अशा कार्यक्रमांमधूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आणि तोच दृष्टिकोन ठेवून महाविद्यालयाच्या वतीने या पारंपारिक दिनाचे आयोजन करण्यात आलेला आहे.'
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून अनेक महापुरुषांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या या वेशभूषेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून लावणी, भक्ती गीत, देशभक्तीपर गीत, सोलो डान्स, नकला, लघुनाटिका आदी कला सादर करण्यात आल्या. या सर्व कलाविष्करांचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना दाद देत महाविद्यालयीन तरुणाई सुद्धा नृत्यांच्या तालावर थिरकली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.एच. करेनवर, पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्याध्यक्ष डॉ.निर्मला मोरे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख डॉ.शिवाजी कुलाळ,प्रा.कृष्णा रानगर, डॉ. एस.जी.गावडे, डॉ.राजेंद्र लवटे, डॉ.मल्लाप्पा सज्जन,डॉ.भीमाशंकर डहाळके, प्रा.हिरामण टोंगारे यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी तर आभार डॉ.अशोक बोगुलवार यांनी मानले.
Comments
Post a Comment