डिजिटल बँकिंगविषयी जतेत जनजागृती राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी
डिजिटल बँकिंगविषयी जतेत जनजागृती
राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी
जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): डिजिटल बँकिंग सेवा आधुनिक भारताच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिटच्या स्थापनेची घोषणा केली. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील ७५ जिल्ह्यांत ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा पूर्वीपेक्षा अधिक सोप्या होणार आहेत. यामुळे खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये पैसे पाठवण्यापासून कर्ज घेण्यापर्यंत सर्व काही सोपे होईल. येणारा काळ हा इंटरनेट व तंत्रज्ञानाचा असल्यामुळे बँकेतील व्यवहार डिजिटल कसे करावे, याविषयी राजे रामराव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक गावोगावी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते एक मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आयोजित डिजिटल बँकिंग जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.पुंडलिक चौधरी, प्रा.तुकाराम सन्नके व डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, बिळुर, डफळापुर, शेगाव, रामपूर, वळसंग, वज्रवाड, बनाळी व कुंभारी या गावात जाऊन डिजिटल बँकिंग म्हणजे काय? त्याचा उपयोग कसा करावा? त्याचे फायदे काय? याविषयी जनजागृती करत आहेत. डिजिटल बँकिंग युनिट्स ही ‘पेपरलेस’ (कागदपत्रांची आवश्यकता नसणारी) सुविधा असून याचं सर्व काम डिजिटल पद्धतीने केलं जाणार आहे. या युनिट्समध्ये ‘सेल्फ-सर्व्हिस’ आणि ‘डिजिटल असिस्टन्स’ अशा दोन्ही पद्धतीने काम केलं जाणार आहे.
या जनजागृती अभियानामध्ये कार्यक्रमाधिकारी प्रा.पुंडलिक चौधरी, प्रा.तुकाराम सन्नके, डॉ. राजेंद्र लवटे, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य प्रा.अतुल टिके, प्रा. प्रियांका भुसनूर, प्रा.विजय यमगर, प्रा.प्रकाश माळी, प्रा.सोनाली पटेकर, प्रा. किरण साळे, डॉ.संगीता देशमुख, प्रा.जयश्री बाळेकाई, प्रा. जयश्री मोटे व डॉ. शंकर सौदागर यांच्यासोबत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सहभागी झाले.
Comments
Post a Comment