भावी पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचं: डॉ. सुभाषचंद्र मालानी
भावी पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचं: डॉ. सुभाषचंद्र मालानी
राजे रामराव महाविद्यालयात पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.५. आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणीय जीवन पद्धतींचा अवलंब केला तर पृथ्वीचं संरक्षण केलं जाऊ शकतं. यासाठी सर्वांनी शाश्वत पर्यांयाची निवड करण्याची आवश्यकता आहे. परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आणि जैवविविधतेचे संरक्षण आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठी महत्त्वाचं आहे, असे प्रतिपादन डॉ. सुभाषचंद्र मालानी यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता आम्ही कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर उपस्थित होते.
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. ५ जून १९७२ रोजी पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्र संघातर्फे एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. भारतासह एकूण १३० देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. परिषदेत पर्यावरणविषयक जाहीरनामा काढण्यात आला. पर्यावरण रक्षण ही मानवाची जबाबदारी आहे, हे मान्य करून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पर्यावरण शिक्षण हा विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९७३ पासुन जगभरात हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी पर्यावरण दिन साजरा करण्याचे अर्धशतक पूर्ण होत आहे. बीट प्लास्टिक पोल्युशन ही संकल्पना घेऊन हे वर्ष साजरे होत आहे. निमित्ताने जत येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेष व्याख्यान, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती यांचा समावेश होता.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. करेन्नवर म्हणाले, यावर्षी जगभर बीट प्लास्टिक पोल्युशन ही संकल्पना घेऊन प्लास्टिक मुक्तीची संकल्पना जगभरातील देश करत असून यामध्ये आपणही सहभाग घेतला पाहिजे व प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. युवराज शिंदे यांनी सुत्रसंचलन प्रा. शिल्पा पाटील तर डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भूगोल विभागासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment