शाश्वत शेतीच विकसित शेतकरी घडवेल: मनोज वेताळ, राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन
जत/ (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय. शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती असेही म्हटले जाते. यावर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असतानाच सध्याच्या काळात शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकाचा अतिवापर होत आहे. विकसित शेतकरी घडवायचा असल्यास शाश्वत शेतीबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. याशिवाय शेतीला पर्याय नसल्यास मत जतचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी 'शाश्वत शेती व विकसित शेतकरी' या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
अधिक बोलताना ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे होत असताना प्रत्येक महिन्यात एका तृणधान्याला समर्पित महिना जाहीर होतो. ऑगस्ट महिना हा राजगिरा या तृणधान्याचा आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर केला पाहिजे, हा उद्देश या अभियानाचा असल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, जमिनीचे आरोग्य, जमिनीची आरोग्य पद्धत, संख्याशास्त्र व शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टीमुळे शेतकरी आधुनिक होत असून नवनवीन संशोधन यातून बाहेर पडत आहे. शाश्वत शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजेच जत तालुक्यातील माडग्याळ येथील बाजरीचे उत्पादन. कृषी विभागाची भक्कम साथ आणि मार्गदर्शन घेत जत तालुक्यातील माडग्याळच्या शेतकरी गट समुहाच्याद्वारे बाजरीचं एकरी ४३ क्विंटल इतके विक्रमी उत्पन्न घेतलं आहे. शासनाकडे एक गाव एक वान या अंतर्गत माडग्याळ गटाची निवड झाली आहे. राज्यातील पहिली विषमुक्त बाजरी म्हणून माडग्याळला मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेकडून या बाजरीला तसे प्रमाणपत्र मिळाले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अतुल टिके तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य प्राध्यापक, महाविद्यालयातील इतर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जत
#राजे रामराव महाविद्यालय, जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment