विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतुकीचे नियम पाळावेत: पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे
जत /प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २९. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली जाते. महाराष्ट्रासह देशांमध्ये रस्ता दुर्घटना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या असून महाविद्यालयीन तरुणांनी रस्ता वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे प्रतिपादन जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या जिमखाना व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'क्रीडा झेत्राचे भविष्य व आव्हानांचे संधित रूपांतर' या विषयावर विषेश व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर उपस्थित होते.
अधिक बोलताना उपनिरीक्षक समाधान घुगे म्हणाले, कळत- नकळत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याकडून चुका होत असतात. आपले आई-वडील व शिक्षकांनी दिलेला उपदेश व मार्गदर्शन याचा विचार करून भविष्यात होणाऱ्या नुकसानीची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवले पाहिजे. अपघात टाळण्यासाठी आपण सतत सतर्क असणे गरजेचे आहे, असेही यावेळी ते म्हणाले. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. श्रीमंत ठोंबरे व प्रा. सिद्राम चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व, जीवनात खेळाचे महत्व, महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य शामराव चव्हाण व क्रीडा शिक्षक वसंतराव जाधव यांचे महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये असलेले योगदान, त्यांनी घडवलेले अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्रात या महाविद्यालयाचा वाटा व महाविद्यालयाचे माजी खेळाडू यांचा क्रीडा क्षेत्रात असलेला दबदबा याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर म्हणाले, राजे रामराव महाविद्यालय स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत या महाविद्यालयाने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. अनेक खेळाडू महाराष्ट्रात तालुका क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक म्हणून आपले योगदान देत आहेत. खेळ व क्रीडांगण हे या महाविद्यालयाचे वेगळे वैशिष्ट्य आहे, असेही यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शारिरीक शिक्षण संचालक प्रा. अनुप मुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अतुल टिके तर आभार प्रा. मेहजबिन मुजावर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी, डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. तुकाराम सन्नके, कॉन्स्टेबल श्रीशैल वळसंग, डॉ. प्रफुल्ल गायकवाड, प्रा. सत्यवान खोटलेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जत
#जनसागर
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment