राजे रामराव महाविद्यालयाचे २० विद्यार्थी भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणुन दाखल
देश सेवेसाठी तत्पर असल्याचा केला निर्धार
जत (प्रतिनिधी): दि.१९. खेळाची व क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा असणाऱ्या जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण विभागातील २० छात्र व खेळाडू यांची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणुन निवड झाली आहे. यामध्ये साक्षी इळगेर, रोहित देवकर, अक्षय गडदे, स्वप्निल कोकरे, अजय ओलेकर, रोहन निकम, प्रमोद चव्हाण, अक्षय खांडेकर, सुशांत शिंदे, धीरज कोळी, सागर शेजुळ, श्रीकांत पाटील, नागनाथ धेंडे, शिवम माळी, दीपक माने, अक्षय चव्हाण, सचिन मोटे, शिवाजी चौगुले, रावसाहेब मोटे व अमर कांबळे याचा समावेश आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, सचिव प्रा. तुकाराम सन्नके, खजिनदार अनिल मिसाळ, संघटनेच्या सदस्या मीनाक्षी अक्की, प्रा. दीपक कोळेकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा.पांडुरंग सावंत, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. अनुप मुळे, प्रा. दीपक कांबळे, प्रा. सुरेश बामणे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला भरती परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी झाली. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया व मेडिकल झाले. या सर्व टप्प्यातील कामगिरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली गेली. त्यानुसार अग्निवीर जनरल ड्युटीसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवून जत येथील डी. के. अकॅडमी सोबत सामंजस्य करार केला होता. अकॅडमीच्या वतीने पहाटे साडेपाच वाजल्यापासून १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मैदानी तयारी करून घेतली जात होती. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने विविध कार्यशाळा व व्याख्यानाच्या माध्यमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सल्ला देत होते. याचा परिणाम म्हणून भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून महाविद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अग्निवीर योजना गेल्या वर्षी सुरु झाली होती. पहिल्याच झालेल्या भरतीत महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते. याही वर्षी ती परंपरा राखण्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
अग्निवीर म्हणून भरती झालेल्या विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव (अर्थ) प्राचार्य सिताराम गवळी, सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, १६ महाराष्ट्र बटालियन सांगलीचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन प्रा. पांडुरंग सावंत, जिमखाना विभागप्रमुख प्रा. अनुप मुळे, प्रा. दीपक कांबळे, तसेच राजे रामराव महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
खेळाची व क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा असणाऱ्या जत तालुक्यातील राजे रामराव महाविद्यालयाचे विद्यार्थी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावतील. या यशस्वी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, परिश्रम व सातत्याने सराव व अभ्यास केला तर कोणतेही यश संपादन करता येते.
प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment