पृथ्वीचे सुरक्षा कवच असणाऱ्या ओझोन थराचे संरक्षण करणे गरजेचे: नहीदा शेख

राजे रामराव महाविद्यालयात जागतिक ओझोन थर संरक्षण दिनानिमित्त एकदिवशीय वेबिनार संपन्न



जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) : दि. १६. ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करून वातावरणात संतुलन राखतो. परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो. जर सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीतलावर पडली तर मानवाशिवाय झाडे, प्राणी व इतर जीवजंतू यांच्यावर अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पृथ्वीचे सुरक्षा कवच असणाऱ्या ओझोन थराचे जतन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालघर येथील ग्रीनविवो सोल्युशनच्या प्रमुख नाहिदा शेख यांनी व्यक्त केले. त्या ग्रीनविवो सोल्युशन्स, पालघर, महाविद्यालयाचा भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय 'जागतिक हवामान बदलाविषयी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

        अधिक बोलताना त्या म्हणाल्या, ओझोन थराचा क्षय झाल्याने त्यातून अतिनील किरणे पृथ्वीवर येऊ लागल्याने जीवसृष्टी प्रभावित होत आहे. ओझोन विवराचे गंभीर परिणाम भविष्यात मानव जातीला भोगावे लागतील.  सूर्याच्या अतिनील किरणांमुळे प्रामुख्याने कातडीचे रोग, त्वचा काळी पडणे, त्वचेचा कर्करोग, सुरकुत्या पडणे आदी विकार होत आहेत. अतिनील किरणांमुळे शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे गोवर, कांजिण्या, त्वचेवर चट्टे यासारखे विषाणूजन्य रोग होत आहेत. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, अतिनील किरणांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. वनस्पतीची प्रकाश संश्लेषणक्रिया मंदावते. पोषक द्रव्याचे प्रमाण कमी होते. वनस्पतीची वाढ खुंटते आणि उत्पादनक्षमता घटते. या अतिनील किरणामुळे समुद्रातील सूक्ष्म वनस्पती व प्राणी कमकुवत बनतात. परिणामतः समुद्री प्राण्यांची संख्या घटते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. किंबहुना मानवापुढील सर्वात मोठे संकट हवामान बदल आहे. यावर वेळीच पावले उचलली गेली नाही तर येणारा काळ प्रचंड रोगराई व विध्वंशाचा असेल.

      या एकदिवसीय वेबिनारचे स्वागत व प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ यांनी केले. सूत्रसंचालन कु. सानिका लवटे तर आभार डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी भूगोल विभागातील प्रा. गंगाधर कोटगोंडे, प्रा. उमेश कौलगे यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आभाशी माध्यमातून मोठ्या संख्येने यामधे सहभागी झाले.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी