राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
जत प्रतिनिधी: दि.१. सत्याचा शोध हाच वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पाया असून 'माणूस' म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तो फार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित 'वैज्ञानिक दृष्टीकोन: काळाची गरज" या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
डॉ. लवटे पुढे म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकाने 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' प्रचार, प्रसार व अंगीकार केला पाहिजे. कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे. दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासण्यासाठी व एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच "निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग" या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची वैज्ञानिक पद्धत आत्मसात केली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्दप्रामाण्य म्हणजे कोणी म्हणतंय म्हणून किंवा ग्रंथप्रामाण्य म्हणजे कोणी तरी पुस्तकात लिहलंय म्हणून चिकित्सा न करता स्वीकारणे हे नाकारतो. समाजात अनेक भोंदू बाबा-बुवा-महाराज चमत्काराच्या नावाखाली लोकांना फसवत असतात. मानवी विकास केवळ 'विज्ञानाच्या' आधारे झालेला आहे. विज्ञान नेहमीच नम्र असून, ते नवनवीन बदलांना आत्मसात करते. धर्माप्रमाणे ते अंतिम सत्याचा दावा अजिबात करत नाही. वास्तूशास्त्र, जोतिषशास्त्र या छद्म विज्ञानाचा गैरवापर करणा-यांपासून सावध राहिले पाहिजे. आपल्या जीवनात आज जे काही घडते, त्यामागे पूर्व संचित, नियती, नशीब अथवा पूर्वजन्मीच पाप आहे अस समजणे हा पळपुटेपणा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन कष्टाला पर्याय नाही हे सांगतो. आत्मा-परमात्मा, जन्म-मृत्यु, प्रारब्ध-संचित-नशीब-मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मांनी, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो. धर्माशिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. वैज्ञानिक दृष्टिकोन नवनवीन सत्य पुराव्याआधारे स्वीकारत जातो, असे सांगून शेवटी डॉ लवटे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, इतरांनी आपल्याशी जसे गैरवर्तन केलेले आपणास आवडत नाही, तसे गैरवर्तन आपण इतरांशी करू नये आणि इतरांनी आपल्याशी जसे सद्वर्तन केलेले आवडते, तसे सद्ववर्तन आपण देखिल इतरांशी करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील म्हणाले, पंडित नेहरूच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे भारताचा विकास झाला आहे. नेहरूंच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धती, सत्यशोधनाचा मार्ग असून जीवनाचे दिशादर्शन आणि व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे साधन आहे. आकलनाची परिपक्वता' वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण होते. भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या नागरिकत्वाच भरण-पोषण प्रामुख्याने हा वैज्ञानिक दृष्टिकोन करतो.
या कार्यक्रमाप्रसंगी रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र या विभागात भित्तीपत्रके, जादूचे प्रयोग, शास्त्रीय उपकरणांचे प्रदर्शन इ. उपक्रमांचे उद्घाटन प्रा. संजयकुमार मगदूम (सह. प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र, केआरपी कन्या महाविद्यालय, इस्लामपूर, एस.पी. बहिरशेठ, अशोक आळेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. महादेव करेन्नवर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध विभागातील जादूचे प्रयोग प्रदर्शनात विद्यार्थी सहभागी झाले. कराजंगी शिवलीला, सरगर तेजस्विनी, माने गणेश, रितेश ईमडे, शेख बशिरा, तोरणे शितल, पवार भारत, माने पूजा, खोत धानम्मा, पुजारी निखिल, सोलनकर संयोगिता, कोळी शितल व बिरादार गायत्री, माळी प्राजक्ता, मोरे ज्ञानेश्वर, साळे सानिका व नाटेकर संगीता, नियामत हैदराबादे, अपूर्वा बिरादार, कलादगे अस्लम, संगीता नाटेकर, अभिषेक लोहार, योगेश चोकले या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पवित्र पोर्टल मधून सांगली जिल्हा परिषदेत गणित विभागाचे प्रा. अक्षयकुमार कांबळे व वृषाली इंगळे यांची नियमित शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोविंद साळुंके, स्वागत डॉ. ललिता सपताळ, सूत्रसंचालन कु. सविता सावंत, पूनम छत्रे यांनी केले तर आभार डॉ. शंकर सौदागर यांनी मानले. यावेळी डॉ. आप्पासाहेब भोसले, प्रकाश सज्जन, प्रा. मल्लाप्पा सज्जन, प्रा. वैभव चांदवले, प्रा. सोमनाथ कारंडे, प्रा. राजेश सावंत, प्रा. महेजबीन मुजावर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment